" तुझसे नाराज नहीं ..... मगर हैरान हूँ ...!!"



Image result for AAMIR KHAN IN LAGAAN

 

   "आमिर खान" पर्फेक्टनिस्ट  ! माझा अगदी कॉलेज पासून रोल मॉडेल आहे.  आणि माझा रोल मॉडेल किती परफेक्ट होता हे जसजसा काळ पुढे जात होता तस तसे सिद्धही होत होते. दिवसेंदिवस त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर वाढत होते   ...! त्याचे एका पेक्षा एक सुंदर अर्थगर्भ आणि मनाचा वेध घेणारे सिनेमा येत होते.  खरं तर जस जसा तो वयाने वाढत होता तस तशी त्याच्यातील संवेदनशीलता अधिका अधिक व्यापक होतानाचा प्रवास थक्क करणारा होता   ....! अगदी "कयामतसे क़यामत तक"  ते "पीके " पर्यन्त त्याने 
 स्वत :च्या अभिनय क्षमतेवर आणि समाजमनावरील विशिष्ट संस्कारांवरही अतिशय प्रभावी असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला   ....!  कधी तो या प्रयोगात "तारें जमीं पर " "थ्री ईडियट्स" या सारख्या चित्रपटातील भाष्यातून कमालीचा यशस्वी होतानाही पाहिले तर कधी "पीके" सारख्या चित्रपटातून थोड़ा अयशस्वी, गोंधळलेलाही दिसला ! "सत्यमेव जयते "  या कार्यक्रमातून त्याने भारतातील  राजकीय, सामाजिक, कौटुंबिक एकूण सर्वच स्तरावरील प्रश्नांना वाचा फोडून भारतीय जनते समोर अनेक गोष्टी उघड केल्या , त्यावर चर्चा घडवून आणल्या आणि जनतेच्या सक्रीय सहभागातून अनेक प्रश्नांची उत्तरे   मिळवण्याचा प्रयत्नही केला  ...! त्यावेळी तर मला आमिर खान बद्दलचा अभिमान अधिकच वाढला ! प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मला  एक गोष्ट मनाला समाधान देऊन जायची  की , हा माणूस केवळ एक्टर नाही , हा हौस  म्हणून सिनेमा करीत नाही  किंवा केवळ पैसा कमावणे हाच याचा उद्देश नाही तर एक भारतीय म्हणून , एक जबाबदार नागरिक म्हणून.,
एक सजग संवेदनशील माणूस म्हणून समाजप्रती आपली जबाबदारी स्वीकारुन या माध्यमातून तो देशसेवा करीत आहे   ..! समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहे !   आपल्या देशवासियांना प्रतिकूल परिस्थितिशी 
लढण्यासाठी स्वत:सोबत समाजातील सर्वच घटकांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील एकीची शक्ति जागृत करून  हा "सेक्युलर" भारताला बळकट करण्याचे किती महत्वाचे कार्य अगदी विचारपूर्वक करीत आहे  ...! 

     आणि एका क्षणी मला " महात्मा गांधींचे " आभार मानावेसे वाटले   ...  हिन्दुस्थान  / पाकिस्तान  फाळणीच्या वेळी ज्या मुस्लिम बांधवांना  हिंदुस्थानच  आपली मातृभूमि आहे असे वाटते ते हिंदुस्थानात राहतील असे घोषित केले आणि म्हणून आज " आमिर खान " आपला आहे ! आमचा  " हिंदुस्थानी " आहे ! 

     पण  परवाच्या त्याच्या वक्तव्याने मात्र  मी चकित झाले   ....!! भारतात असहिष्णुता वाढत आहे ! माझ्या पत्नीला आमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते ! तिने मला देश सोडण्याबाबतचा विचारही  बोलून दाखवला ! हे आमिर खान बोलू शकतो ह्या वर विश्वास ठेवणे माझ्यासाठी कठीण  होते ! कारण मिडिया ध चा मा करण्यात पेशवेकालीन आनंदीबाईंचा सीक्वेल आहे   !! 

     भारतातील असहिष्णुता वाढत आहे   ... म्हणजे भाजप सरकार हे हिंदू प्रणीत सरकार आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे असे म्हणायचे आहे का ?  मग कांग्रेस सरकारच्या काळातील मुंबईतील केवळ मुस्लिम समुदयाने केलेली दंगल आणि महिला पोलिसांचा केलेला विनयभंग  , केवळ  मुस्लिम मतपेटीवर डोळा ठेवुन कांग्रेसने अनेकदा मुस्लिमेतर समाजाची केलेली पिळवणूक , त्यावेळी सहिष्णुता कुणी दाखवली?  पण त्यावेळी तू काही असहिष्णुते बद्दल बोललेले मी ऐकले नाही!  मला वाटले , बरेच आहे तुझ्या सारख्या विवेकी माणसाने अश्या समाजाचा एक व्यक्ति म्हणून स्वत:ला का " पेश " करावे ?
तू  " न्यूट्रल " राहून आपले कार्य करतो आहे , किती महान !!

     तुझ्या पत्नीला तुमच्या मुलाच्या भविष्या बद्दल चिंता वाटते   ...  म्हणजे ? हिंदुस्थानात इतर मुले नाहीच का ? त्यांच्या भविष्याचा विचार तू करणार नाहीस ?  मग तारें जमींपर  सोडून देणार तू ? इतका आत्मकेंद्रित कधीपासून झालास ? ज्या हिंदुस्तान मध्ये तुझे भविष्य घडले जे आज सर्व जग पाहत आहे त्या हिन्दुस्ताना बद्दल तू असा कसा बोलू शकतोस ?  पाकिस्तानातील  मुलांचे भविष्य तुला माहित आहे ? नोबेल विजेति " मलाला" आज  पाकिस्तान सोडून अमेरिकेत आहे !  का ? ती  तर तिच्याच मातृभुमित पाकिस्तानात नकोशी आहे ! का ? एका  मुस्लिम राष्ट्रात एक सुधारणावादी , पुरोगामी विचारांची मुस्लिम शाळकरी मुलगी नको  आहे ! का ? आणि तू म्हणतोस तुझ्या मुलाचे भविष्य धोक्यात आहे !!

     आणि सगळ्यात कहर म्हणजे तू पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणतोस तुझा देश सोडण्याचा विचार आहे!  तो तूच आहेस ना ? जो अतुल्य भारत म्हणत , सत्यमेव जयतेचा घोष करीत देशाच्या एकतेसाठी आणि एकूणच देशाच्या प्रतिमेला अधिका अधिक उज्वल प्रकाशमान करण्याची ग्वाही देतोस ! आणि आज तू सगळ्या समस्यांपासून पळ कसा काढतोस ? तुझा तुझ्यावरील विश्वास उडाला आहे की तुझ्या मातृभूमीवरील ? तुझ्या अश्या विधानांमुळे तू आपल्या मातृभूमीचा , आम्हा सर्व भारतीयांचा अपमान केला आहेस !

     तुला जर खरच असे असुरक्षित वाटत होते तर आपल्या भारतीय बांधवांशी मोठ्या विश्वासाने संवाद साधू का नाही शकलास ? तू संवाद साधलास पण चुकीचा,संशयास्पद सर्व भारतीयांना गृहीत धरून आणि अतिशय बेजबाबदारपणे !तिथे  " सरफ़रोश " मधील ACP अजयसिंघ राठोड  कुठेच दिसला नाही ! " लगान " मधला भुवनला तू कसा विसरलास ? आम्ही तर त्याला आमच्यात जगवण्याचा प्रयत्न करीत आहोत   ...! आणि तूच आता अश्या आपल्याच शिलालेखांना  उध्वस्त करीत चालला आहेस ?  तुझा प्रवास प्रकाशाकडून अंधाराकडे होत आहे !!

      प्रिय आमिर " तुझसे नाराज नहीं  ..... मगर हैरान हूँ   ...!!"



                                                                                         " समिधा "




     

" घन दूर अंधाराचे …!! "


 
 मन मनास सांगे 
नको आकारु 
रूप दुर्दैवाचे   .......

     मन मनास सांगे 
     शोध आधार 
     रूप सौजन्याचे  ……  

मन मनास सांगे 
नको घाबरु 
जग लढणा-यांचे   ……

     मन मनास सांगे 
     कर प्रकाश 
     घन दूर अंधाराचे   …!!
     घन दूर अंधाराचे   …!!
 
माझ्या सर्व सुहृदय मित्र मैत्रिणींना  दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दीपावलीच्या नव  तेजाने सर्वांची आतंरिक मनं उजळून जाउ देत  ....!
नव प्रकाशाने आत्मरंगी नवचेतना  उमलू दे  ....!!

                                                                                       " समिधा "


" हतबल …!"


 
     तो तिला बोलत होता    …  तो बोलत नव्हता तर तिला अनुकूचीदार , धारदार शब्दांनी सोलत होता ! तिच्या असण्या नसण्याची लक्तरे सर्वांसमोर फेडत होता   …! तिच्या शरीरावर  घाव असतीलच पण आता ते मला आणि माझ्या सारख्या इतरांना दिसत नव्हते    !  पण आता तिच्या मनावरचे घाव मला तरी  बसत होते ! तिच्या भावनांच्या या उड़ना-या चिंधड्या आणि त्यामधून तिची आर्त वेदना  आणि आक्रोश माझ्या आणि माझ्या सारख्या तिथे हज़र सर्वच जणींच्या मनापर्यंत पोहचत असलेच   …!!!

     ती स्त्री दिवसभर लोकल ट्रैन मध्ये भेळ विकून आपल्या तोड़मोड़क्या संसाराला हातभार लावणारी व  कष्ट करून आपल्या एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणा साठी तिच्या भविष्या साठी धडपडणारी मायमाउली होती! आणि तो पुरूष तिचा मालक/नवरा होता (परंपरेने  नव-याला मालक बोलविले जाणे म्हणजे नवरा बायको यांच्यातील  स्तर इथेच नोकर मालक  म्हणून अधोरेखित केला जातो ) दिवसभर कष्ट करणा-या आपल्या हक्काच्या बायकोकडे दारु पार्टी साठी तो पैसे मागत होता आणि ती ते द्यायला तयार नव्हती ! त्याला नकार  म्हणजे  … नव-याला नकार मग मालकाच्या आवेशात तिला भर लोकांमध्ये शिव्यांची लाखोली वाहत होता !
(घरातील  शाररिक आणि मानसिक त्रास याची कल्पनाच नको )

"अगं  ये x x x x x ने  मला पैसे दे !
मारुन टाक तुझ्या पोरीला   ....!
कायला तिला उरावर घेऊन राहलियस … ?
रांडेचे तुझ्या x x x x x "
असं आणि बरच काही    ....!

      त्याला नाही पण तिला आजूबाजूचं भान होतं  . तो जेवढ्या रागाने आणि त्वेषाने तिच्या कानाजवळ ओरडत खेकसत शिव्या देत होता तितक्याच संयमाने आणि शांतपणे ती त्याला थोपविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती !  आणि मी , आजूबाजूचे आम्ही काय करत होतो ?

     मला त्याचा भयंकर राग आला होता !  अश्या परिस्थितीत स्त्रियांना मदत करणारी कोणतीच यंत्रणा नाही का   …? अश्यावेळी पोलिस ख़ास करून लेडीज पोलिस आसपास असणे किती गरजेचे आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली ! दूसरे काही नाही पण त्याला शाब्दिक दम देऊन तत्पुरता तिचा होणारा मानसिक छळ तरी थांबवता आला असता ! म्हणून मी पूर्ण प्लॅटफॉर्मवर एक फेरी मारून आले पण मला साधे  रेल्वे  पोलिसही दिसले नाहीत ! हा मी सभ्यपणे  कायद्यात राहून केलेला एक "निष्फळ" प्रयत्न !

    मला त्याचा भयंकर राग आला होता ! अश्या परिस्थितीत वाटत होते त्याच्या कॉलरला पकडून चांगले लाथाबुक्क्यानी , कानाखाली दोन चार लगावून बदडून काढावे !  हा मी केलेला  असभ्यपणे कायदा मोडून तिला मदत करण्याचा "निष्क्रिय" प्रयत्न !

     मला त्याचा भयंकर राग आला होता !  मी माझ्या आजूबाजूच्या बायका पोरींना विचारले आपणच जरा त्याला "समजवावे"  का ?  पण कोणी "तो दारुड्या आहे आपल्यालाही काहीतरी बोलायचा , त्यांच्या भांडणात पडणे नकोच! बरे दिसेल का? उगीच लोकांना शोभा !  त्यांना कसली आली आहे अब्रू आपल्याला ते शोभत नाही ! त्यांचे ते पाहुन घेतील ! आणि मग हळूहळू एक एक जण तिथून काढता पाय घेऊ लागल्या !

     आता मला भयंकर राग आला होता !  माझा, माझ्या आजूबाजूच्या सुसंस्कृत म्हणवणा-या लोकांचा, आमच्या असंवेदनशील  संस्कारांचा , आमच्या सोकोल्ड सभ्यपणाचा  आणि यातून येणा-या वांझोटया भितीचा आणि  "बृहन्नडा"  हतबलतेचा   ……!!!

                            " समिधा "





      



एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

 

     किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिकाव्याने हल्ला करावा आणि जीत्या जागत्याला आपल्यापासून दूर दूर न्यावे   …!  जिथे त्याला आपली हाक ऐकू येत नाही   … आपला आक्रोश  … आपले आक्रंदन  दिसत नाही   ! या सा-याच्या पलीकडे तो निघून जातो   …!  मागे उरतात आपले कोंडलेले श्वास आणि अधीर मन आणि मनाचा न दिसणारा कोंडमारा  !  गेलेल्याचे दुःख असते  की त्या सोबत उरलेल्या आनंदाच्या  ठेव्याचे आता काय करायचे याचा शोक असतो  …!!  असा "तो" आपला मित्र असतो आप्त असतो  आणि कधी कधी कुणीच नसतो   … पण काही क्षण जरी आपण "त्या" व्यक्ति सोबत घालवले असतील तरी पुढच्याच काही काळात तो आपल्यातून गेला तरी हृदयात खोल खोल खड्डा पडतो ....! अदॄश्य दुःखाची कळ छातीत येतेच  येते ....!!


           अगदी अलीकडेच आमच्या कॉलनीत  एक ड्रेस मटेरियल चे दुकान उघडलेले होते ! गेला आठवडा मी
ते पाहत होते ! दुकानाबाहेर लावलेले ड्रेसेस रोज पाहत होते,  आणि एकदिवस शेवटी त्या दुकानात प्रवेश केलाच   ....  तिथे एक २४/२५ वर्षाची लग्न झालेली मुलगी होती , तीचेच ते कलेक्शन होते! मोठ्या आवडीने तिने मला खुप सारे ड्रेसेस दाखविले, एक दोन मी  घेतलेही पण घरी येऊन पाहिले तर एक छोटा तर एक मोठा होत  होता  . पुन्हा मी  तिच्या दुकानात गेले  , तीनेही न वैतागता न रागवता अगदी हसत मला पुन्हा ड्रेसेस हसतमुखाने आणि तेव्हढ्याच उत्साहाने दाखवले   … पुन्हा घरी येऊन तेच छोटा मोठा  ! आता जर मी  तिच्या कड़े पुन्हा ड्रेसेस बदलायला गेले तर ती  नक्कीच वैतागणार म्हणून मी जरा कचरतच तिच्या दुकानात गेले पण तिच्या चेह-यावरचे तेच हसमुख भाव ! मग मात्र मला तिच्या बद्दल अतीव प्रेमच वाटले !

       थोड्या आस्थेनेच तिच्या दुकानाची तिची माहिती विचारली   … आज तिच्या दुकानात तिचा नवरा आणि तिची दीड वर्षाची छोटुली मुलगी पण होती  !  तिने सांगितले तिचे वडील लहानपणीच वारल्याने आईसोबत लहानपणापासूनच काहिनाकाही कष्ट करायची आवड होती ! लग्न झाल्यावरही हा उत्साह कमी नाही  झाला।    दुकानात तिने ड्रेसेस सोबत इमिटेशन ज्वेलरी पण विकायला ठेवली होती.   घर मुलगी संसार  सारे सारे सांभाळून ती स्वतः सर्व खरेदी करण्यासाठी दादर मुंबई ठाणे इथे प्रवास करायची   …! ताई मला अजुन खुप वाढवायचे आहे माझे दूकान   । ही तर अजुन सुरवात आहे ! मीहि तिच्या मेहनीति स्वभावावर खुश झाले , तिचा तो उत्साह पाहुन तिचे कौतुक वाटले। . आणि नको असताना अजुन दोन अधिकचे ड्रेसेस तिच्याकडून खरेदी केले ! आणि माझ्या मैत्रीनींनाही तिच्या दुकानाची माहिती देईन हाँ असं तिला सांगितले तर तीला आनंदही झाला ! हसत हसत मी तिचा निरोप घेतला  !

       नंतर मी एकदोन  दिवस येता जाता तिला कधी लहानग्या मूली सोबत गि-हांइकाना हसतमुखाने ड्रेसेस दाखवताना पाहत होते   …!  पण एक दिवस  दूकान बंद दिसले मला वाटले आज सोमवार म्हणून दूकान बंद असेल ,  पण नंतर दोन दिवस दूकान बंदच होते !  माझे मलाच वाटले गेली असेल गावी, किंवा नव-या बरोबर मुलीसोबत फिरायला  … ! पण सलग एक आठवडा दूकान बंदच होते , खरंतर मला असंच दुकानातून ज्वेलरी पहायची होती  .   पण दूकान बंदच ! तिला भेटून एक आठवडा उलटला होता  .

      त्या दिवशी रोजच्या प्रमाणे सकाळी लेकिला शाळेच्या बसवर सोडायला मी घराच्या गेटपाशी उभी होते
माझ्या सोबत अजुन एक दोन जणी आपल्या मुलांना घेऊन उभ्या असतात  .  बस आली मुले गेली की आम्ही काही मिनिटे बोलत असू  … आणि बोलता बोलता माझी मैत्रीण दीपिका बोलली  अगं आमच्या बिल्डिंग मधली एकजण गेली ना अचानक   … ! मी विचारलं कोण गं ?  अगं तीच जिचे ते नवीनच कोप-यावरचे ड्रेसचे
दूकान होते !  ती अशी बोलली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली ! डोळ्यापुढे अक्षरशा अंधेरी आली ! कसेतरी तोंडातून शब्द आले , अगं काय सांगतेस काय ? गेल्या आठवडयात तर मी तिच्याकडून चार ड्रेसेस घेतले ! किती गोड हसमुख मेहनती होती  गं  ती !  काय  झालं काय गं तिला !  हार्ट अटॅक  आला असं कळलं ! काय ? एवढ्या लहान वयात ? खरच माणसाचं काही काही खरं नाही  !

       मला प्रचंड मोठा धक्का होता तो !  तसे काही नाते नव्हते तिच्याशी पण तरीही तिच्या सोबत घालवलेल्या त्या क्षणांसोबत नकळत  तिच्या स्वप्नांशी माझे नाते जोडले गेले होते !  तिच्या हसमुख मेहनती स्वप्नाळु कष्टांसोबत मनाचे भावबंध जोडून बसले होते !  तिच्या त्या छोटुल्या लेकिसोबतच्या तिच्यानंतर तिचं कसं होणार ह्या काळजीसोबत मीही काळजीत पडले होते !  किती किती नात्यांनी मी जोडले गेले !  तिची स्वप्न इथेच ठेवून गेली ती माझ्या जवळ   … त्यांचांच आक्रोश माझ्या मनात उमटत होता पण तो तिच्या पर्यन्त कसा जावा  … ?

        जे अवेळी जातात त्यांच्या स्वप्नांचे काय करावे ?  त्यांनी योजून ठेवलेल्या प्लॅन्सचे  काय करावे? त्यांनी त्यांच्या जीवन डायरीची काही पाने आगाऊच लिहिली असतील त्या पानांचे काय करावे?  चटका बसतो जिव्हारी अश्या "अवेळी" गेलेल्यांच्या सरणावरील ज्वाळांचा   .... आपण कितीही दुरुन त्यांना पहात असलो तरी ! मग त्यांच्या सोबतच्या  अद्वैतांचे काय होते  ?  ते जळतात आयुष्यभर काळ  कितीही लोटला तरी   … मध्ये मध्ये आठवत राहते त्यांची सोबत  … ! कितीही हळुवार असली तरी चटका देणारीच   ....!

      किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!



                                                                                         "  समिधा "

     



         

" सारं सारं जपून ठेवलय .... !! "


 

प्रिय  ....,

     तू लिहिलेल्या  "त्या " ओळींवरून प्रेमळ नजर फिरवली  .... अलगद हात  फिरवून त्यांना स्पर्श केला तेंव्हा  खुप दिवसांपासूनची तुझी अक्षरं मायेच्या , प्रेमाच्या स्पर्शाला आसुसलेली वाटली   ....  माझ्यासारखीच   …!! 

     तू दिलेले घडयाळ जपून ठेवलय ....! त्या वेळेसारखंच जेंव्हा तू अनं मी वेळेचे भान विसरून बोलत असू  …
ते शब्द आणि त्या मागील अर्थ जे तेंव्हा समजले  अनं  काहींचे अर्थ जे अजूनही वेगवेगळ्या संदर्भात शोधून लावत असते  .... तुला पुन्हा पुन्हा नव्याने भेटत असते  … पारखत असते  .... शोधत असते  ....!! 

     तू दिलेले पेन जपून ठेवलय  … !   पेनातली शाई कधीच संपलीय  … पण त्या शाईने तू गिरवलेले माझे नांव अजूनही तसेच ताजे  … टवटवीत आहे , त्या  कवितेच्या ओळी सारखेच  … " गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा "

     तू दिलेल्या  गज-याला जपून ठेवलय  .... !  फुलं , पाकळ्या गळून गेलेत …  पण फुलं गुंफलेली गुंफण अजुन तशीच आहे … फक्त फुलांच्या  जागी  तुझ्यात अडकलेल्या प्रत्येक क्षणांच्या स्मृतीं गुंफल्या आहेत …! 

     काळ  पुढे सरकलाय पण तुझ्यासोबतचे क्षण काळासोबत माझ्याजवळच घुटमळत आहेत  …! त्या क्षणांना मुक्ती मिळावी असं मलाही वाटत नाही  … !! कारण जेंव्हा जेंव्हा जगण्याच्या मुळाशी ते क्षण मी  शिंपडते जगणे ताजे ,  टवटवीत  होते …! 

     हो मी  हे  सारं  सारं  जपून ठेवलय  निर्मळ , निरागस ,  उत्फुल्ल जगण्यासाठी   …!!


                                                                                          " समिधा "

    


    

" प्रिय पाऊसा ......!



प्रिय  …,
    खरं  तर ' सात जून ' हा दिवस पावसाच्या आगमनाचा  संकेत असतो   ....  मागच्या वर्षी मात्र पहिला पाऊस  कधी  पडला माहीत नाही   ....  पण यावर्षी  'पहिला पाऊस ' सात जूनलाच आला  ..... पहिल्या पावसाची पहिली  सर म्हणजे मातीच्या गंधाचा दरवळ  आणि आतापर्यंत तापलेल्या जमिनीला शीतलतेचा स्पर्श   ....  यावेळी सर्वांच्याच चित्तवृत्ति उमलुन येत असतात   … एक विलक्षण नवचैतन्याची लहर सा-या वातावरणात वहायला सुरुवात होते   .... त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्साहाची हिरवळ फुलत असेलच  ....!! 

     हा अनुभव मला नविन नाही   ....  पण प्रत्येक वर्षी मनाला तो नविन भासतो   …!! म्हणूनच पहिल्या पावसाने दिलेला अनुभव एव्हढया आत्मीयतेने सांगावासा वाटतो   ....!! 

     ज्या दिवशी पहिला पाऊस आला त्या दिवशी माझी मनस्थिती थोड़ी बैचेन होती   … पण पाऊस आला आणि मनाची बैचेनी , मरगळ पार विरुन गेली   …!! मातीच्या  चित्तवृत्ति उल्हासित झाल्या   … आनंदी आवेगाने तो मृण्मयसुगंध साठवत  होते   … पण माला अजूनही न सुटलेले कोडं त्या दिवशीही पुन्हा कोडयात टाकून गेले     ....!!!

      पहिल्या पावसाचे आणि माझे काही  अनामिक बंध आहेत  ....?  की त्याच्या येण्याने माझ्या हृदयात अगदी एक अनामिक हुरहुर तो लावून जातो  ....  कशाची असते ती   …? जुन्या स्मृती अश्यावेली मातीच्या गंधासोबत आपलाही दरवळ मांगे सोडून जातात   …!!!

     माझ्याभोवतीचा हां अनुभव घेऊन मी पहिल्या पावसाला  एक फ्लाईंगकिस देऊन निरोप दिला   …! तोही  विरघळला  हळुवार थंडगार हवेत   …ओलेत्या पानांवरून घरंगळणा-या थेंबात   …!! मी  पाहिलं  तो शहारला  … माझ्यासारखाच   .... एका अनामिक स्पर्शाने   ....!!!


                                                                                       " समिधा "

    

'कन्फेशन बॉक्स' ….!

 सॉरी  शोना  .... परत असे नाही होणार   … !  आणि असं मी म्हणताच माझी लेक माझ्यावर काही वेळापूर्वी रागवलेली असते ती मला एका क्षणात प्रेमाने बिलगते   ....! 
       खरच आहे आपण कित्येकदा आपल्या पिलांवर केवळ  आपल्याला आवडले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या आनंदासाठी केलेल्या कित्येक गोष्टीसाठी  आपण रागावलेलो असतो  …… ! फटकावलेले असते …!  पण  ती  मात्र आपल्याला किती सहजपणे माफ करतात …! ( खरच माफ करतात की आपला तो "सॉरी"   म्हणतानाचा  बापूडवाना चेहरा पाहून त्यांना त्यावेळी दया येते…?)  पण   जसजसे ते बुद्धीने आणि वयाने मोठी होतात त्यांच्यातील मानापमानच्या  जाणिवा जाग्या होतात ……!  त्यांच्यातील बालसुलभता हळुहळू कमी होऊन  मोठ्यांमधला व्यवहार त्यांच्या ठायी येतो तेंव्हा मात्र आपण अस्वस्थ होतो  …!  ह्या  स्वभावातील आवर्तनातून आपण मोठेही गेलेलो असतो   … … तरीही त्यांच्या वागण्याने आपल्याला धक्का बसतो. 

        खरे तर आपल्या मुलांना समजून घेणे आणि समजावून सांगणे एका पातळीवर फारच कठिण असते  .   त्यावेळी आपल्या संयमाची खरी कसोटी लागते   .... !  मुलांमुळे संयम आणि सहनशीलता आणि अतीव  माया हे  स्वभावतील स्थित्यंरण  आपले पूर्ण व्यक्तिमत्त्व बदलू शकते   !   आई /बाबा  होण्यापूर्वीचा आपला हटटीपणा , संताप तुलनेने कमी झालेला असतो  … हृदयातील माया , कणव  जास्तच वाढलेली असते  … !  एक नवा आयाम संपूर्ण  जगण्याला आणि वागण्याला मिळत जातो  .... ! 

        मी माझ्या लेकीची  अत्यंत आभारी आहे  … !  तिच्यामुळे आज माफ़  करण्यातला सहजपणा मला कळला  … !  माफ करण्यातला आनंद कळला  ....! संयम, सहनशीलता, प्रेम याची नेमकी ओळख करून दिली   .... !!   
थैंक्यू शोना  .....!! 

पुष्पांजली कर्वे


                                                                                                                                              समिधा                                    

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......